लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/ नागपूर/ कोल्हापूर/ सोलापूर : राज्यातील बहुसंख्य भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याने यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याची वर्दी मिळाली आहे. मराठवाड्यात रोहिण्या बरसल्या तर विदर्भातही सात जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दुपारी पाऊण तास सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत चांगला पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे द्राक्षबागा, मिरची, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातही दुपारी पाऊस झाला. सोलापूर शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पंधरा मिनिटे सरी कोसळल्या़मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी ठिकठिकाणी पाऊस झाला. बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाºयासह पाऊस झाला. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा जिल्ह्यात सरी कोसळल्या. यवतमाळ जिल्ह्यात तासभर पाऊस झाला. कोकणात सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाने मान्सूनपूर्वची सलामी दिली.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 7:13 AM