लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : नजीकच्या खानापूर येथील एका अल्पभूधारक शेतमजुराचा २८ मे रोजी सायंकाळी स्वाइन फ्लूच्या आजारावर उपचार सुरू असताना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने पातूर शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.पातूरनजीकच असलेल्या खानापूर येथील रहिवासी देवलाल तुळशिराम शिरसाट (५५) यांचा २८ मे रोजी सायंकाळी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसा अहवालसुद्धा देण्यात आला आहे. ते आजारी पडल्यामुळे त्यांना २३ मे रोजी पातुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला; परंतु त्यांना सर्दी, पडसे, खोकला व ताप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी २५ मे रोजी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल २८ मे रोजी रुग्णालय प्रशासनास प्राप्त झाला होता. त्या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे नमूद करण्यात आले होते. हा अहवाल प्राप्त झाल्याच्या दिवशीच सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा आप्त परिवार आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी पातुरातील गुरुवारपेठ भागात राहणारे मनीष त्र्यंबक काळपांडे यांचा १५ एप्रिल रोजी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. त्या घटनेला एक महिना उलटला नाही तोच पातूर तालुक्यातील खानापूर येथील देवलाल शिरसाट यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पातूर तालुक्यात स्वाइन फ्ल्यू पसरत असल्याचे स्पष्ट होत असून, पातूर शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.स्वाइन फ्लूच्या आजाराबाबत आरोग्य विभाग सतर्क असून, आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांमार्फत याबाबत सर्वेक्षण सुरू आहे.- डॉ.चिराग रेवाळे, वैद्यकीय अधिकारी, पातूर.