लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .
वरसावे येथील जुन्या पुलाचा वापर हा वसई - गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी केला जातो . परंतु सदर पूल हा खूपच जुना व जीर्ण झाला असून सुरक्षीततेच्या दृष्टीने आता तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने त्यासाठी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची अधिसूचना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांनी जरी केली होती . परंतु ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी पत्र पाठवून दिवाळीत मुंबई - नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची असलेली वाहतूक आणि डायव्हर्शन रस्त्याच्या डागडुजूची कामे बाकी असल्याने दिवाळी नंतर बंदीचा निर्णय घेण्यास कळवले होते . त्या अनुषंगाने ती अधिसूचना रद्द केली होती .
आता उपायुक्त काळे यांनी वरसावे पुलाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने नव्याने अधिसूचना जारी केली आहे . त्या नुसार १३ ते १५ च्या मध्यरात्री पर्यंत असे तीन दिवस जुन्या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे .
जुन्या पुलावरून दोन पैकी एकाच मार्गिकेवरून लहान वाहनांची वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे . बॅरेकेटिंग लावून सलग तीन दिवस पुलाची एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी असणार असल्याने ठाणे येथून पालघर, गुजरात कडे जाणारी जड अवजड वाहने ही वरसावे पुलावरून न जाता अन्य पर्यायी मार्गावरुन केली जाणार आहे.
ठाणे शहरातून वर्सोवा मार्गे पालघर सुरत बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहने ही मुंब्रा - खारेगाव टोलनाका – मानकोली – भिवंडी- वाडा – मनोर – पालघर – मार्गे जातील. दुसऱ्या पर्याय हा मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – भिंवडी – नदी नाका – अंबाडी – वज्रेश्वरी – गणेशपूरी – शिरसाट फाटा मार्गे जातील. तर मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – अंजूर फाटा – कामण-चिंचोटी – वसई विरार महानगरपालिका हद्दी मार्गे जातील.
यातून महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ह्या बंदीतून सवलत देण्यात आली आहे . या दिवसात वरसावे पूल आणि परिसरातील महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या मार्गावरून अनावश्यक कारणा शिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे . पर्यटक आणि बाहेरगावी जाणाऱ्यांनी देखील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे .