राजू काळे,
भार्इंदर- गेल्या २४ वर्षांत दोनवेळा दुरुस्ती झालेल्या आणि त्यानंतरही धोकादायक ठरल्याने तिसऱ्यांदा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वरसावे पुलाला चिरीमिरीचा धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्यात आला असला, तसे फलक लावले असले; तरी वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत तेथून अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. काळोखाचा फायदा घेत या पुलावरून ही वाहने सोडली जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघड झाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मात्र असे काही सुरू असल्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. गुजरातला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवरील ४३ वर्षेे जुन्या वरसावे पुलाला धोका निर्माण झालेला असतानाही त्यावरून बिनदिक्कत वाहतूक सुरू असल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. बांधकाम क्षेत्रातील उच्चस्तरीय तज्ज्ञांकडून सध्या त्या पुलाची तपासणी सुरू आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्याची दुरूस्ती होईल. त्या काळात त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. सध्या या पुलावरुन फक्त हलक्या वाहनांना प्रवेश देण्याचे सक्त आदेश आहेत. तसेच वाहतुकीच्या वेगावरही नियंत्रण आणण्यात आले असून तो ताशी २० किमी इतका कमी करण्यात आला आहे. अवजड व दोनपेक्षा अधिक एक्सेलच्या वाहनांना माजिवडा जंक्शन- चिंचोटीमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर जाण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ९ सप्टेंबरला दिले आहेत. बांधकामतज्ज्ञांनी अद्याप या पुलाच्या दुरुस्तीच्या सूचना एनएचएआयला दिल्या नसल्याने तेथून फक्त हलक्या वाहनांची वाहतुक सुरु आहे. परंतु, तिन्हीसांजेनंतर काळोखाचा फायदा उठवत वाहतूक शाखेच्या डोळ््यादेखत या पुलावरुन अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहने घोडबंदर गावात जाणाऱ्या रस्त्यावर तसेच आसपास रस्त्याकडेला थांबवली जातात. पुलावरुन जाण्यासाठी काळोख पडण्याची वाट पाहिली जाते. तो पडून लागला, की त्वरित एकामागोमाग एक अवजड वाहने पुलावरुन गुजरातच्या दिशेला सोडली जातात. चिरीमिरी घेतल्याशिवाय वाहने या पुलावरून जाणे शक्यच नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. अन्यथा वाहतूक शाखेच्या डोळ्यादेखत अवजड वाहने कशी जाऊ शकतात, असा त्यांचा प्रश्न आहे. >२४ वर्षांत दुरूस्तीची तिसरी मोहीमअगोदरच कमकुवत झालेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी २०१३-१४ मध्ये हा पूल तब्बल दीड वर्षे बंद ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी १९९२ मध्ये तो दुरुस्तीसाठी दोन महिने बंद ठेवण्यात आला होता. १९७३ मध्ये बांधण्यात आलेला हा पुल अवघ्या १९ वर्षातच दुरूस्तीसाठी बंद राहू लागल्याने त्वाहापासूनच त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पुलासाठी गेल्या २४ वर्षांतील ही तिसरी दुरुस्तीची मोहीम आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुंचे कठडे जीर्ण झाले आहेत. गर्डरमधील काही ठिकाणचे सांधे कमकुवत झाले आहेत. त्यामुळेच त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण काळोखाचा फायदा घेत ती बिनदिक्कत सुरू आहे. हलक्याच वाहनांना प्रवेशएनएचएआयचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल म्हणाले, तज्ज्ञांकडून पुलाची पाहणी होईल. त्यांच्या सूचनांनुसारच पुलाची दुरुस्ती हाती घेण्यात येईल. तूर्तास या पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक तीही नियंत्रित वेगात सुरु आहे.