ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 20 - प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी बीड बायपास रस्ता जड वाहनांसाठी दिवसभर बंद ठेवण्याच्या स्वत:च्या निर्णयात पोलीस आयुक्तांनी गुरूवारी बदल केला. शुक्रवारपासून हा रस्ता दुपारी १२ ते ४ या कालावधीत जड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सीएमआयए आणि मालवाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बीड बायपास रोडवर सतत प्राणांतिक अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्यानंतरही अपघातात घट होत नसल्याने १८ एप्रिल पाासून बीड बायपास जडवाहनांसाठी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला होता. याबाबतची अधिसूचनाही त्यांनी जारी केली होती. सात दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर त्यांनी ही अधिसूचना जारी केली होती. मात्रर या निर्णयामुळे नगर, धूळेकडे जाणारी वाहतूक पैठण रोडने वळल्याने त्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. रेल्वेस्टेशन येथील मालधक्का येथून रेशनचे धान्य, खते आणि अन्य जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या मालवाहतूकदारांच्या अडचणी वाढल्या होत्या. शिवाय शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसी दरम्यान मालाची ने-आण करण्यासाठी लागणारा खर्च वाढल्याने तसेच वेळेत माल मिळणे मुश्कील झाल्याची तक्रार सीएमआयएने केली होती. या सर्व बाबींचा विचार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिसूचनेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सी.डी.शेवगण यांनी दिली. ते म्हणाले की, ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांसोबत सलग दोन दिवस झालेल्या बैठकीतील चर्चेत एक तोडगा काढण्यात आला. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत या मार्गावर नागरीकांची वर्दळ जास्त असते. यामुळे या कालावधीत जड वाहनांना प्रवेश बंदी ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले. यामुळे केवळ दुपारी १२ ते ४ या कालावधीत आणि रात्री ९ ते सकाळी ७ पर्यंत जड वाहनांना बीडबायपासवर प्रवेश राहणार आहे. या निर्णयाचे औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने स्वागत केले आहे.