श्यामकुमार पुरे सिल्लोड, दि. 16 - सिल्लोड तालुक्यात 88 गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 12 गावांत मागणी असूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टँकर सुरू झाले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. प्रशासनाने 49 गावांत 65 टँकर सुरू केले आहे. 27 गावांत 43 विहिरीचे अधिग्रहण केले आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. बहुतेक गावांतील सार्वजानिक व शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील धरणांची पाणीपातळी कमी झाली आहे. आवश्यक तेथे तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे.यावर्षी विविध मध्यम प्रकल्प व विहिरीतून शेतीसाठी पाणी उपसा झाल्याने बहुतेक धरणाची पाणीपातळी कमालीची घटली आहे. सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चिन्ह दिसत असताना प्रशासनाने 65 टँकर सुरू केले आहेत. अनेक गावांत भुजल सर्वेक्षण अधिकारी यांच्या प्रमाणपत्राअभावी अजूनही टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहे.खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील...सिल्लोड तालुक्यातील धरण व पाणी पातळी अशी:- सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात केवळ 4.67 टक्के पाणी आहे. केळगाव 4 टक्के, उंडणगाव, रहिमाबाद प्रकल्पात मृतसाठा आहे. सिल्लोड तालुक्यातील या धरणातून अनेक गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. अजूनही काही धरणातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. कापूस व मिर्ची लागवडीसाठी मध्यम प्रकल्पांतून होणारा पाणी उपसा थांबविला गेला नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होईल.49 गावांत 65 टँकर सुरू असलेली गावे अशी:- सिल्लोड तालुक्यातील पळशी, म्हसलाखुर्द, उपळी, लोनवाडी, खातखेडा, धानोरा, दीडगाव, पिम्प्री, वरूड, अनाड, गव्हाली, बोजगाव, रहिमाबाद, तलवाड़ा, पिरोळा, डोईफोडा, टाकलीखुर्द, आसडी, पिंपळगाव घाट, शेखपूर, पालोदवाडी, धावड़ा, डखला, सराटी, बबोदवड, जंजाला, अंधारी, मुखपाठ, पांगरी, बोरगाव सारवनी, सावखेडा, पिंपलदरी वाडा, बालापुर, कायगाव वाडी, पिम्पलगाव पेठ, म्हसला बुद्रुक, निल्लोड वाडी, पिम्पलदरी, वडोदचाथा, पानवडोद, धोत्रा, वडालीटाका, नाटवी, चिंचवन, सिरसाळातांडा, को-हाळातांडा, रेलगाववाडी, कोटनान्द्रा, परदेशीवाडी या 49 गावांत 65 टँकर सुरू आहेत.12 गावांचे प्रस्ताव धूळ खात पडून तालुक्यातील 12 गाव जलकीघाट, जुनापानेवाड़ी, तांडाबाजार, टाकलीजीवरग, उंडंणगाववाडी, घटाम्ब्री, पानस, चिंचखेडा, डोंगरगांव, हट्टी, सोनप्पावाडीचे प्रस्ताव भूजलच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडले आहेत. तर वांगी बुद्रुक, प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंजुरी अभावी पडून आहे. जनता पाण्यासाठी वन वन भटकंती करीत आहे. तर प्रशासन कागदी घोड़े नाचवून नागरिकांची थट्टा करताना दिसत आहे. वरील गावात तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: May 16, 2017 4:05 PM