मुंबई : ‘डॉक्टर आॅफ मेडिसिन’ (एमडी) ही पदवी परत मागविणारे पत्र जे. जे. रुग्णालय प्रशासनाने खासदार हीना गावित यांना पाठविले आहे. हीना गावित यांनी जे.जे. रुग्णालयातून एमडी केले. मात्र त्यानंतर सरकारी रुग्णालयात येणारी बंधपत्र रुग्णसेवा (बाँड) त्या करू शकल्या नाहीत, असे कारण पत्रात देण्यात आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागावलेल्या माहिती अधिकारातून हे प्रकरण उघडकीस आले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या नियमानुसार डॉक्टरांनी शासन रुग्णसेवेचा म्हणजेच बंधपत्र सेवा कालावधी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्या डॉक्टरला ५० लाख रुपयांचा ‘बाँड ब्रेकिंग शुल्क’ भरावे लागतात. यानुसार भाजपाचे आमदार, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या हीना गावित यांनी रुग्णसेवा देखील केली नाही तसेच ते न केल्याचे शुल्कही भरले नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी लोकायुक्तांकडे केली होती.याविषयी, लोकायुक्तांनी वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिनगारे आणि जे. जे.रुग्णालय प्रशासन यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यावर जे. जे.रुग्णालय प्रशासनाने, गावित यांना मूळ कागदपत्रे नजरचुकीने परत केल्याचे म्हटले आहे, असे चेतन कोठारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जे. जे. रुग्णालय प्रशासनाने यावर कारवाई करत हीना गावित यांना पत्र पाठवून नियमानुसार ‘एमडी’ प्रशासनाकडे जमा करावी, असे नमूद केले आहे. याविषयी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, गावित यांना पत्र पाठविले असून येत्या सोमवारी त्या मूळ कागदपत्रे परत करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)आघाडी सरकारच्या काळातील नियमएमडी पदवी मिळवल्यानंतर एक वर्षे सरकारी रुग्णालयात सेवा बजावण्याचा नियम आघाडी सरकारच्या काळात बनवण्यात आला. विशेष म्हणजे, हीना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे त्यावेळेस वैद्यकीय शिक्षणमंत्री होते.जे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी वैद्यकीय पदव्युत्तर पदवीप्राप्त आहेत, त्यांना बॉण्डच्या नियमातून वगळण्याचा आदेश राज्य शासनाने गेल्याच महिन्यात काढला आहे. यापूर्वी पदवीसाठीची ही सवलत आता पदव्युत्तरसाठीही आहे. - खा. डॉ. हीना गावीत
हीना गावित यांची ‘एमडी’ रद्द होणार
By admin | Published: April 15, 2017 2:04 AM