नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी येथील दोन आलिशान बंगल्यांमध्ये मागील आठवड्यात रंगलेल्या हवाइयन थीम पार्टीवरील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली होती. याप्रकरणी ताब्यात असलेल्या बॉलिवुड अभीनेत्री हीना पांचालसह अन्य २५ संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने ग्रामीण पोलिसांनी त्यांना सोमवारी (दि.५) पुन्हा इगतपुरीच्या न्यायालयात हजर केले. न्यालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत हिनासह २०संशयितांची जामीन अर्ज फेटाळून लावला.
अंमली पदार्थ सेवनाच्या गुन्ह्याचा तपास पुढे करावयाचा असल्याने हीनासह वीस संशयितांचा ताबा ग्रामीण पोलिसांकडून न्यायालयाकडे मागितला गेला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरत एका दिवसाच्या तपासाकरिता पुन्हा हीनासह वीस संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले.आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.इगतपुरी न्यायालयाचे न्यायाधीश पी. गिरी यांच्या न्यायालयात सोमवारी या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी झाली. तीन कामगार, छायाचित्रकार, स्वयंपाकी अशा पाच संशयितांना न्यायालयाकडून जामीन मंजुर करण्यात आल्याने दिलासा मिळाला. दरम्यान, सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयात रेव्ह पार्टीमधील सर्व संशयितांकडून अंमली व मादक पदार्थांचे सेवन केले तसेच ते बाळगल्याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे असा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने हीना पांचालसह २० संशयितांना एका दिवसाच्या अटीवर पुढील तपास करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या क्राइम ब्रॅन्चकडे वर्ग केले.