- मनीषा म्हात्रे, मुंबईमुंबईत अस्तित्वात नसलेले पोलीस ठाणे दाखविण्याचा प्रताप करणाऱ्या पालिका नोकर भरती प्रकरणातील आरोपींनी मयत आजी आणि अविवाहित काका यांचे वारसदार दाखवून एका महिलेसह दोघांची भरती केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ताडदेव पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. चेतन हेलिया, कुणाल जोगदिया आणि सन्नी विजुडा अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी कुणाल आणि सन्नी आधीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आले आहेत. पालिकेच्या डी वॉर्डमध्ये दोन ते नऊ लाख रुपये घेऊन पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांच्या जागी बोगस उमेदवारांची भरती केली जात होती. ग्राहक समाजसेवा संथा अध्यक्ष अशोक म्हस्कर, सचिव शिवप्रकार तिवारी खजिनदार हिराभाई सोसा यांनी हा प्रकार समोर आणून दिला. २०१५ मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अटक सत्र सुरु केले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सर्व १२ कक्षांकडून पालिकेच्या २६ वॉर्डांअंतर्गत गेल्या पाच वर्षात झालेल्या सफाई कामगारभरतीची तपासणी करण्यास सुरुवात झाली. या तपासणी अंतर्गत पालिकेच्या विविध वॉर्डमधील बोगस भरती केल्याचे उघड झाले. याप्रकरणी अनेकांची धरपकड सुरु झाली होती. आतापर्यंत याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले. आग्रीपाडा, गावदेवी आणि ताडदेव पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. ताडदेव परिसरात हर्षा कानजी हेलिया (४२) या कुटूंबियांसोबत राहतात. वडिल कानजी हेलिया ३० वर्षापूर्वी मयत झाले. ते पालिकेत सफाई कामगार होते. त्यांच्या जागेवर अनुकंपात लहान भाऊ अनिल १५ वर्षापूर्वी ई वॉर्डात क्लार्क म्हणून नोकरीस लागला. तसेच पालिकेत काम करत असलेले काका प्रवीण आणि आजी मथु यांचे निधन झाले असताना त्यांच्या जागेवर खऱ्या वारसदारांऐवजी खोटे वारसदार दाखवून जागा बळकावल्याचे उघड झाले.माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड होताच हर्षा हिने ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.याप्रकरणी कुणाल जोगदिया, देवजी राठोड, रतन जेसिंग हेलिया, चेतन हेलिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मयत आजी आणि अविवाहित काकाला दाखविले वारसदार
By admin | Published: January 04, 2017 4:45 AM