ठाणे : मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या पाच-सहा किमी परिसरातील सिंगापूर, पळू, सोनावले आदी माळशेजच्या जंगलास लागून असलेल्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजऱ्यासह सुमारे ७० जणांच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्ती आणि प्राणी मित्र अशा १२५ ते १५० जणांचे पथक तैनात करून शोधमोहीम हाती घेतली आहे. २६ दिवसांपासून या परिसरात हैदोस घातलेल्या या बिबट्याने दोन जणांसह सुमारे २३ गाई, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत. शक्यतोवर त्यास बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न आहे. यास न जुमानता पळ काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जागीच ठार करण्याचे आदेश नागपूर येथील वन्यजीव संरक्षक विभागाने दिल्याचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी सांगितले. सशस्त्र दलासह स्थानिक पोलिसांसह, सशस्त्र पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण आणि खाजगी वन्य प्राणी मित्र आदींच्या पथकामुळे मोरोशी, सिंगापूर, सोनावळे, पळ या गावांतील संपूर्ण जंगलास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने या जंगलात बिबट्याचा शोध सुरू आहे. कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील मोरोशी, सोनावळे सिंगापूर या परिसरात त्याचा वावर असल्याने त्याला पकडण्यासाठी फौजफाटा मंगळवारी दिवसभर रानमाळावर दबा धरून होता. संध्याकाळी सोनावळे गावात उपवनसंरक्षक किशोर ठाकरे गेले असता त्यांना गावकऱ्यांनी घेराव घालून जाब विचारण्यासाठी गर्दी केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. सद्यस्थितीला सिंगापूर गावच्या गावकुसाच्या परिसरात आढळलेला हा नरभक्षक बिबट्या जवळच्याच पोल्ट्रीफार्म व तलावाजवळ असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. याशिवाय हेदवली, खापरी, फांगणे, फांगू, गव्हाण, मानिवली पळू या गावांच्या जंगलात सशस्त्र पथक तैनात केले आहे. सायंकाळी जंगलातून घराकडे जात असलेल्या गाई गुरांच्याकळपावर हल्ला करण्याच्या प्रयत्न फसल्यानंतर या जनावरांच्या मागे चालणाऱ्या सोसावळे येथील शेतकरी बारकू भोईर यांच्या पाठीमागून हल्ला करून मानेला पकडले. तर सिंगापूरजवळील वाघेवाडीतील मीराबाई वारे पहाटे उठल्या असता त्यांच्यावर हल्ला करून गावाच्या जवळच त्यांना ठार केल्याच्या घटनेने हा परिसर भयभीत झाला आहे.
नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी १५० जणांचे सशस्त्र पथक तैनात
By admin | Published: August 24, 2016 2:27 AM