मुंबई : निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या आकाशात ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर सुरू झाली आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टर आणि विमानांची दिवसाकाठी किमान २५० लँडिंग होत आहेत. निवडणूक हंगामाच्या निमित्ताने या उद्योगात ५५० कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होणार आहे.
निवडणुकांमध्ये अधिकाधिक प्रचार वेगाने करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर केला जातो. यंदा बाहेरील राज्यातून येणारे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते हे चार्टर विमानाने येत असून, राज्याच्या अंतर्गत व दुर्गम भागातील पुढील प्रवास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करीत आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकांत दुपारी १२ नंतर प्रचाराला सुरुवात होत होती. मात्र, यंदाची निवडणूक एकाच टप्प्यात असल्यामुळे सकाळी नऊपासूनच प्रचार सुरू होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज होत आहेत.
यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ राष्ट्रीय आणि स्थानिक प्रमुख पक्षांनीच हेलिकॉप्टरचे बुकिंग केले नाही, तर अनेक छोट्या पक्षांनीदेखील आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर व विमानाचे बुकिंग केले आहे.
नियमित विमानसेवांना काही प्रमाणात फटका
-हेलिकॉप्टर किंवा विमान कोणत्या जातीचे व कोणत्या प्रकारचे यानुसार एका तासासाठी दर चार लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे उड्डाणाच्या किमतीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. -नेते, त्यांचे प्रोटोकॉल लक्षात घेत त्यांना प्राधान्याने उड्डाण व लँडिंगसाठी परवानगी देण्यात येत आहे.त्यामुळे याचा काही प्रमाणात फटका हा नियमित विमानसेवांनाही बसताना दिसत आहे.
कोणाकोणाकडून हेलिकॉप्टर वापर?
भाजप - भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर करत आहेत. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, पंकजा मुंडे, नितीन गडकरी हे नेते गरजेनुसार वापर करत आहेत.
शिंदेसेना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे नियमित हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. तर मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, रामदास कदम, अभिनेता गोविंदा हे गरजेप्रमाणे वापरतात.
अजित पवार गट - उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमित हेलिकॉप्टरचा वापर करत असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गरजेप्रमाणे वापरतात.
काँग्रेस - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख हे नियमित हेलिकॉप्टर वापरत आहेत. तर मुकुल वासनिक, विजय वड्डेटीवार, इम्रान प्रतापगढी, विश्वजित कदम हे गरजेप्रमाणे वापरतात..
शरद पवार गट - शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदारअमोल कोल्हेही हेलिकॉप्टरने प्रचारासाठी फिरत आहेत.गरज असेल तर जितेंद्र आव्हाडही हेलिक्टॉप्टर वापरतात.
उद्धवसेना - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत हेलिकॉप्टरने प्रचार दौरे करत आहेत.
निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रमाणात खासगी विमान व हेलिकॉप्टरची वाहतूक वाढली आहे त्यावरून आपल्या मूलभूत पायाभूत सुविधांना किती मर्यादा आहेत हे लक्षात येत आहे. ज्या मार्गांवर सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली आहे, तेथे कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी. - मंदार भारदे,विमान वाहतूक व्यावसायिक