डिप्पी वांकाणी, मुंबईअलीकडेच छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केलेला भीषण हल्ल्ला आणि गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नक्षलवादी कारवाया वेळीच रोखता याव्यात म्हणून हवाई टेहळणीसाठी आणखी हेलिकॉप्टर्स तैनात करण्याची मागणी केली आहे. यासोबतच राज्य सरकारने पवन हंसकडून अतिरिक्त हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाने निविदाही जारी केली आहे.नक्षलवादी राज्यात केव्हाही आपली वार्षिक नियोजनबद्ध आक्रमण मोहीम राबविण्याची शक्यता आहे. यात ते नक्षलींना व्यापक प्रशिक्षण देत असतात. तसेच त्यांचे वरिष्ठ नेतेमंडळी लढ्याची आखणी करतात. नक्षलवादी आक्रमक होत असताना केंद्रानेही नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांऐवजी भारत-तिबेट सीमा पोलीस तैनात (आयटीबीपी) करण्याची योजना स्थगित करून नक्षलविरोधी मोहिमेसाठी राज्याला पाठबळ दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच नवी दिल्लीत या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. गडचिरोली जिल्ह्यात हवाई टेहळणी आणि बचाव कार्यासाठी सध्या आमच्याकडे एकच हेलिकॉप्टर आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी एक हेलिकॉप्टर देण्याची विनंती पवन हंसकडे करण्यात आली आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी सांगितले.केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या काढून न घेण्याची आमची विनंती मान्य केली आहे, असेही बक्षी यांनी सांगितले.गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन्स (२५०० जवान) तैनात आहेत. हे जवान महाराष्ट्र पोलीस आणि सी-६० कमांडोजसोबत जंगलात गस्त घालतात. भाषेच्या समस्येमुळे भारत-तिबेट सीमा पोलीस दलाला या भागात तात्काळ जम बसविता येणार नाही. तसेच या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सर्वत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाची यंत्रणा सक्रिय आहे. छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे, असेही बक्षी यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीसाठी हवीत हेलिकॉप्टर्स
By admin | Published: April 23, 2015 5:22 AM