- विवेक पांढरे
यवतमाळ : फुलसावंगी येथील अवघ्या नववीपर्यंत शिकलेला शेख इस्माईल शेख इब्राहीम याने सींगल सीट हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी तो रात्रदिवस कष्टही घेत होता. या त्याच्या जगावेगळ्या छंदामुळेच परिसरात तो मुन्ना हेलिकॉप्टर म्हणून परिचित होता. दिवसभर वेल्डींगच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री उशिरा तो हेलिकॉप्टर निर्मीतीवर मेहनत घेत होता. १५ ऑगस्ट रोजी याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक घेऊन पेटंट मिळविण्याची त्याची लगबग सुरू हाेती मात्र, या हेलिकॉप्टरच्या पंखानेच फुलसावंगीतील या उमद्या रँचोचा घात केला. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हेलिकॉप्टरच्या मागच्या पंखात बिघाड होऊन तो वरती फिरणाऱ्या पंखावर आदळला आणि हे पाते केबीनमध्ये बसलेल्या शेख इस्माईलच्या डोक्यात कोसळले. यात त्याचा मृत्यू झाला.
शेख इस्माईल हा फुलसावंगी येथील २८ वर्षाचा तरुण घरची परिस्थिती तशी बेताचीच. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तो वेल्डींगच्या दुकानात काम करायचा. परिस्थिती हलाखीची असली तरी त्याची स्वप्ने मात्र मोठी होती. आपल्या कल्पनाशक्ती व अजोड कलेच्या भरोवश्यावर त्याने स्वबनावटीचे हेलिकॉप्टर तयार करण्याचा चंग बांधला होता. मागील तीन- चार वर्षांपासून तो या सिंगल सीट हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी परिश्रम घेत होता. मुन्नाने या हेलिकॉप्टर निर्मितीसाठी मारुती ८०० चे इंजीन वापरले होते. याच्या तो वारंवार चाचण्या घेत असे. या चाचण्यात त्रुटी आढळल्यानंतर तो पुन्हा या सिंगल सीट हेलिकॉप्टरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करीत असे. हे हेलिकॉप्टर आता पूर्णत्वाच्या टप्प्यात होते. त्यामुळेच येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रात्यक्षिक घेवून पेटंट मिळविण्याची त्याने तयारी सुरू केली होती. यासाठीच तो दिवसरात्र मेहनत घेत होता.
मंगळवारी दिवसभर वेल्डींगच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री उशीरा दीडच्या सुमारास तो हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी आला. हे प्रात्यक्षिक घेत असतानाच हेलिकॉप्टरच्या मागच्या पंख्यात बिघाड झाला आणि अवघ्या काही क्षणातच तो पंखा तुटून वरती फिरणाऱ्या मोठ्या पात्यावर आदळला. हेच पाते हेलिकॉप्टरच्या केबीनमध्ये बसलेल्या शेख ईस्माईल उर्फ मुन्नाच्या डोक्याला लागले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पुसदला हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मुन्नाच्या या अकस्मात अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.