पुणे : हॅलो, अमित शहा बात करेंगे, पंतप्रधान कार्यालयातून फोन, राष्ट्रपती भवनातून फोन, मुख्यमंत्री कार्यालयातुन फोन...अशा एका मागून एक हाय प्रोफाइल कॉल्सनी गुरुवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन सतत खणखणत राहिला. सर्वांना एकच जाणून घ्यायचे होते. आगीत कोणी दगावले तर नाही ना? आणि कोरोना लसीच्या उत्पादनाला तर धोका पोहचला नाही ना?
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अखेर अकरा महिन्यांच्या प्रतिक्षेतनंतर जग थांबवणाऱ्या कोरोनावरची लस आली. यामुळेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरमला भेट देऊन कोरोना लसीच्या उत्पादनाचा आढावा घेतला. त्यानंतर काही दिवसापूर्वीच सिरमची कोरोना लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि प्रचंड उत्साहात लसीकरणाला सुरुवात देखील झाले. आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ही लस टोचणी घेणार असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडे लागले आहे. मात्र गुरुवारी (दि.21) दुपारी दोनच्या सुमारास याच सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग लागली. त्यात दुर्दैवाने ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
पुण्यातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याचे समजताच जिल्हाधिकारी कार्यालयातील फोन सतत खणखणू लागले. गेल्या एक वर्षांपासून कोरोनामुळे हैराण झालेल्या भारतासह संपूर्ण जगाला अशेचा किरण देणारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमधील कोरोना 'लस' सुरक्षित आहे ना यासाठी थेट राष्ट्रपती भवनसह प्रधानमंत्री कार्यालये, स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्य मंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकारी यांना फोन केले.
या संदर्भातील बातम्या काही क्षणात व्हायरल झाल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फोन वाजण्यास सुरूवात झाली. पहिलाच फोन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून आला व स्वत: शहा यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्याकडून वस्तुस्थितीची माहिती घेतली व लस सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. हा फोन सुरूच असताना राष्ट्रपती भवनातून, त्याच वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री यांचा देखील फोन आला. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री तथा अजित पवार , आरोग्य मंत्री राजेश टोपे सर्वांनीच फोन केले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख आग विझण्यापूर्वीच घटनास्थळी पोहचले.