मुंबई : पेट्रोलसाठी हेल्मेटची सक्ती करण्याच्या शासन निर्णयास सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहून या निर्णयाची व्यवहार्यता तपासून त्यावर सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.रस्त्यांवरील वाढते अपघात टाळण्यासाठी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून राज्यात होणार होती. मात्र, पेट्रोल पंपचालकांनी या निर्णयास तीव्र विरोध दर्शवून १ आॅगस्टपासून पेट्रोल खरेदी बंदचा इशारा दिला. विधानसभेत हा विषय गुरुवारी अजित पवार यांनी उपस्थित केला. हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याच्या निर्णयामुळे राज्यात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, रावते यांनी घेतलेल्या या निर्णयामागची भावना शुद्ध आहे. तरीही हा निर्णय जर जाचक वाटत असेल तर त्याची व्यवहार्यता तपासून पाहून तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (प्रतिनिधी)
हेल्मेट सक्तीवर तोडगा काढू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 5:19 AM