मुंबई : रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, आता ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ असा नियम करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. वाहनांची वाढती संख्या आणि वाहन चालकांच्या बेपर्वाईमुळे दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत आहेत. विशेषत: रस्ते नियमांची पायमल्ली करत भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे शहरात अपघात वाढत आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमाची सक्तीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी हेल्मेट घातले नसेल, तर पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)>तेलंगणातला नियम महाराष्ट्रातहेल्मेट वापरण्यास दुचाकीस्वारांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारने हा नियम केला आहे. गेल्या महिन्यात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनेही हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचा नियम केला आहे. >पंपावर पोलीस तैनात करावेत...सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे, पण हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे बंधन पेट्रोल पंप चालकांवर घालण्यात आले असले, तरी तशी सक्ती करणे वा पेट्रोल नाकारणे आम्हाला शक्य होणार नाही. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस तैनात करावेत, ज्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत, अशी मागणी पेट्रोल पंप चालकांनी केली आहे.पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट असेल, तरच त्याला पेट्रोल देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचेही मंत्री रावते यांनी स्पष्ट केले. मात्र, अनेक पोलीस कर्मचारी स्वत:च हेल्मेट घालत नाहीत, ही बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यावर, अशा पोलिसांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.
हेल्मेट नाही तर पेट्रोलही नाही!
By admin | Published: July 22, 2016 5:36 AM