पुणे : हेल्मेट सक्तीवरून शहरात निर्माण झालेल्या गदारोळानंतर आता सर्व महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व शिक्षकांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. याबाबतची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना पाठविले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना विनाहेल्मेट प्रवेश बंद करावा, असे पत्र पाठविल्यानंतर विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. आता महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे उत्सकुतेचे ठरणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांना तसेच विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थांना हेल्मेट वापराबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक ते प्रबोधन आणि कार्यवाही करावी, असे विद्यापीठातर्फे सर्व प्राचार्य, संचालक व विभागप्रमुखांना कळविण्यात आले आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे पाठविण्यात आलेले परिपत्रक फलकावर प्रदर्शित करावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हेल्मेट वापरण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने आवाहन करणारे परिपत्रक काढले आहे. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावर आवश्यक ते प्रबोधन आणि कार्यवाही करावी, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. परिपत्रकाचे सर्व वर्गामध्ये वाचन करावे, ते सूचना फलकावर प्रसिद्ध करावे, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) प्रतिनिधीमार्फत हेल्मेट वापरण्याचा संदेश सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवावा. तसेच आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना विनाहेल्मेट प्रवेश बंद करावा, असे नमूद केले आहे. हेल्मेटवापराचे फायदेही परिवहन विभागाने सांगितले आहेत.भारतातील अनेक शहरांमध्ये हेल्मेट वापरणे बंधनकारक असून, ते कित्येक वर्षांपासून वापरणाऱ्या व्यक्तींना कोणताही त्रास झालेला नाही. सर्वांचा लाडका सचिन जर ४५ डिग्री तापमान असताना हेल्मेट घालून १00 धावा काढू शकतो किंवा महेंद्रसिंह धोनी जर हेल्मेट घालून सलग दोन दिवस विकेटकिपिंग करू शकतो तर हेल्मेट घालणे हे लोक तक्रारी करतात, तेवढे त्रासाचे नाही. फक्त सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, असेही प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.प्रादेशिक परिवहन विभागाने विद्यापीठाला कळविलेल्या निर्णयाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी तसेच विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करण्याचा दृष्टीने महाविद्यालयांनी हेल्मेट वापरण्याबाबत आपल्या स्तरावर आवश्यक ते प्रबोधन आणि कार्यवाही करावी. त्यामुळे विद्यापीठातर्फे सर्व संलग्न महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. - डॉ. संजयकुमार दळवी, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हेल्मेटसक्तीबाबत विद्यापीठाचे परिपत्रक४देशात वाहन अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत चालली असून, गेल्या वर्षी सुमारे पाच लाख वाहन अपघातांत अंदाजे दीड लाख व्यक्तींचा बळी गेला, तर सुमारे साडेतीन लाख व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्या. अपघातामुळे डोक्याला गंभीर इजा होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात. रस्ते अपघातात दगावणाऱ्यांमध्ये १५ ते ३५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ६५ टक्क्यांहून अधिक आहे. हेल्मेट वापरल्याने अपघात टळणार नसेल तरी अपघात घडल्यास डोक्याला मार लागून मृत्यू ओढावण्याचा धोका आणि मेंदूला गंभीर इजा पोहोचण्याची शक्यता निश्चितच कमी होते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
विद्यार्थी, शिक्षकांना हेल्मेटसक्ती
By admin | Published: March 07, 2016 2:10 AM