विनोद गोळे, पारनेरदुचाकी चालविताना डुलकी येते, हेल्मेट घातले तर डोके तापते, मोबाइलवरही बोलता येत नाही, हेल्मेट न वापरण्यासाठी तुम्ही अशी कारणे शोधत असाल तर थांबा! ही बातमी वाचून तुमच्या या समस्या सुटतीलच; शिवाय तुमचा प्रवास आनंददायी व सुरक्षित होईल़ आनंद किसन मुळे या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तुमच्या या समस्या सोडविण्यासाठी आणि आनंददायी प्रवासासाठी एक अनोखे हेल्मेट तयार केले आहे़अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयातील अकरावीच्या विज्ञान शाखेत आनंद शिक्षण घेतोय़ हेल्मेट न वापरण्यासाठी अनेक जण अनेक बहाणे शोधतात़ त्यातील काही बहाण्यांचा आनंदने अभ्यास केला़ हेल्मेट घातल्यानंतर डोके तापते, डुलकी येते आणि कोणाचा फोन आला तर तोही रिसिव्ह करता येत नाही, अशी कारणे सररास कानावर येतात़ मात्र, आता यातील एकही कारण कोणीही सांगू शकणार नाही, असे हेल्मेट देवीभोयरेसारख्या छोट्या खेड्यात राहणाऱ्या आनंदने तयार केले आहे़ आनंदच्या घराशेजारील एक वायरमन दुचाकी अपघातात मयत झाला़ त्याच्या अपघाती मृत्यूमुळे छोटी-छोटी मुले रडताना पाहून आनंदचेही मन हेलावले़ हेल्मेटची सक्ती नको तर ते वापरण्यासाठी युक्ती करायला हवी, या विचाराने आनंदचा शोध सुरू झाला़ यात त्याला त्याचा भाऊ अशोक याने मदत केली़ अशोक बी़एस्सीचे शिक्षण घेतोय़ आनंदच्या संकल्पनेतून अवघ्या बाराशे रुपयांत हे हेल्मेट तयार झाले आहे़ हेल्मेटला आतून थर्माकोलचे आवरण आहे. त्यात हेल्मेटवर प्रेशर सेन्सर व रेडिओ सर्कीट बसविले आहे. त्याचे कनेक्शन दुचाकीच्या प्लगजवळ बसविले. त्यामुळे हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरू होत नाही़ यासह त्यात ब्लुटूथ असून फोनही घेता येतो़ त्यात दोन ठिकाणी सेल जोडले असून, एक छोटा पंखा जोडला आहे. या पंख्यातून थंड हवा मिळते व आतली गरम हवा बाहेर फेकली जाते़ रेडिओ कंट्रोल सर्कीटच्या माध्यमातून व्हायब्रेटर कार्यान्वित होते. हे व्हायब्रेटर चालकाला डुलकी येऊ देत नाही़ प्रेशर सेन्सरच्या पट्ट्यांवर दाब येऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित होते. राज्यात सगळीकडे दुचाकीधारकांना हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे. पण सक्तीपेक्षा जर हेल्मेटमध्ये अशा सुविधा दिल्यास प्रत्येक जण आवडीने हेल्मेट वापरतील व अपघात टळतील, म्हणून हे हेल्मेट बनविले.- आनंद मुळे, हेल्मेट बनविणारा विद्यार्थी
डुलकी येऊ न देणारे हेल्मेट!
By admin | Published: February 08, 2016 4:34 AM