ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.०६ - ‘हेल्मेट’सक्तीबाबत समाजात विविध प्रतिक्रिया येत असल्या तरी अनेक विद्यार्थी अद्यापदेखील याबाबती गंभीर नसल्याचे चित्र आहे. हीच बाब लक्षात घेता शहरातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षकांना दुचाकीवर ‘हेल्मेट’ लावून येणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांनी हा पुढाकार कुठल्याही शासकीय निर्देशांवरुन घेतलेला नाही. ‘हेल्मेट’ घालून येण्यासंदर्भात रितसर निर्देशच दिलेले आहेत. महाविद्यालयांचे सूचना फलक व संकेतस्थळावरदेखील हे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक महाविद्यालयांत तर अंमलबजावणीदेखील सुरू झाली असून प्रवेशद्वारावर तपासणीदेखील होत आहे. ‘हेल्मेट’ अनिवार्य करणाºयांमध्ये रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
काही महाविद्यालयांत ‘हेल्मेट’सक्ती करण्यात आलेली नाही. परंतु ‘हेल्मेट’ घालण्यासंदर्भात जागृतीवर भर देण्यात येत आहे. सूचना फलकावर ‘हेल्मेट’ वापरण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. काही महाविद्यालयांत मार्गदर्शन सत्रांचेदेखील आयोजन करण्यात आले. विद्यापीठ व तंत्रशिक्षण संचालनालयाकडूनदेखील यासंदर्भात पुढाकाराची अपेक्षा असल्याचे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले.