ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या विदीर्ण अवस्थेमुळे अवघा महाराष्ट्र हेलावला असून राज्यातील जनता व राजकारणी आपापल्या परीने या शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही राजकीय पक्ष मात्र यातही राजकारण करण्याचा संधी शोधत असून ' बॉलिवूडमधील कलाकारांनीही संकटातील शेतक-यांना मदत करावी, अन्यथा त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात येईल' असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेतर्फे देण्यात आला आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हिंदीतील कलाकारांनीही मदत करावी असे आवाहान मनसे चित्रपट सेनेने एका पत्राद्वारे केले आहे. बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक आदींनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे त्यात म्हटले आहे. तसेच या आवाहनाचा गंभीरपणे विचार करून मदत न केल्यास तर त्यांना धडा शिकवला जाईल, त्यांच्या चित्रपटांवर बंदी आणून खेळ बंद पाडले जातील, असा धमकीवजा इशाराच पत्रात देण्यात आला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार वर्षानुवर्षे महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत, जनतेने त्यांना अपार प्रेम दिले आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांमुळे फक्त मराठी कलाकारांचे नव्हे तर हिंदीतील कलाकारांचेही पोट भरते. मग मराठी इंडस्ट्रीतील कलाकार शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे आले असताना हिंदीतील कलाकारांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, ते का मदत करू शकत नाहीत, असा सवाल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे.