अतुल जयस्वाल/अकोलासाने गुरुजींच्या विचारांचा पगडा असलेले काही वर्गमित्र एका सामाजिक समस्येवर तोडगा काढण्याच्या ध्येयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी ‘एसजी’ नावाचा ग्रुप स्थापन केला आहे.पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील साने गुरुजी शाळेत १९८४ ते १९८८ अशी चार वर्षे सोबत शिकलेले वर्गमित्र ‘व्हॉट्स अॅप’च्या माध्यमातून एकत्र आले. हैदराबाद येथे एका नामांकित कंपनीमध्ये व्यवस्थापक असलेले किरण गायकवाड व पुणे येथे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक असलेले सत्यजीत गायकवाड यांनी ३ आॅगस्ट २०१५ रोजी ‘एसजी’ हा व्हॉट्स अॅप ग्रुप स्थापन केला. यामध्ये त्यांनी वर्गमित्रांना ‘जॉइन’ केले. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश व विदेशातही या ग्रुपचे सदस्य आहेत. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर असे एकूण ८० सदस्य या ग्रुपमध्ये आहेत.शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करायची, याबाबत व्हॉट्स अॅपवरच चर्चा केली जाते. सर्व मित्र मिळून मदतीचे स्वरूप ठरवितात. सर्व ठरल्यानंतर ग्रुपचे सदस्य शेतकऱ्याला मदत करतात, अशी माहिती मूळचे पुण्याचे व सध्या अकोला येथे सेंट्रल वेअर हाउस कॉर्पोरेशनमध्ये तांत्रिक सहायक पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत भागवत यांनी दिली.
‘सोशल कट्ट्या’वरून शेतकऱ्यांना मदत
By admin | Published: November 14, 2015 3:50 AM