मुंबई : गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. आरोग्य कार्ड या सामाजिक उपक्रमाचे प्रेस क्लब येथे उद्घाटन करताना देसाई बोलत होते.मुंबई महानगरपालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या पॅरेन्ट्स असोसिएशन आॅफ थॅलेसिसीम युनिट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य कार्ड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी देसाई म्हणाले की, जीवन कष्टात जात असल्याने गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या कामात स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हातभार लावला पाहिजे. मुलांचे आहाराकडे होणारे दुर्लक्ष, मुलींमधील लोहाचे कमी होणारे प्रमाण, वाढत्या वयानुसार होणारे बदल त्यानुसार समस्या या विषयांकडे ध्यान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या अंदाजे ५२ हजार मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा रक्तगट व रक्त तपासणी केली जाईल. अॅनेमिया, थॅलेसेमिया, रक्तगट अशा १८ प्रकारच्या चाचण्या करून प्रत्येक मुलांचे संगणकीय आरोग्य कार्ड तयार करण्यात येईल. त्यानुसार त्यांच्या व्याधीचे निदान करून त्याच्यावर योग्य उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे वेळीच त्याच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
गरीब मुलांच्या आरोग्यासाठी मदत करा!
By admin | Published: November 19, 2016 2:22 AM