पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण मंडळ उपसभापतिपदासाठी नुकतेच निवडून आल्यानंतर मिरवणूक, गुलाल व फटाके या गोष्टींना फाटा देऊन नवनिर्वाचित उपसभापती विष्णू नेवाळे यांनी नाम फाउंडेशनकडे दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी नेवाळे यांची निवड झाली. एखाद्या पदाची निवड झाली की, मिरवणुकीवर खर्च केला जातो. मात्र, नेवाळे यांनी सामाजिक भान राखले. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ, माजी उपसभापती नाना शिवले, सदस्य धनंजय भालेकर, विजय लोखंडे, चेतन घुले, फजल शेख, निवृत्ती शिंदे, श्याम आगरवाल, सविता खुळे, शिरीष जाधव, लता ओव्हाळ, नोव्हेल ग्रुपचे अमित गोरखे, टाटा मोटर्सचे पदाधिकारी सुरेश जामले, सुरेश जासूद, उमेश साळवी आदी उपस्थित होते.नेवाळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील दुष्काळाची भयाण परिस्थिती लक्षात घेऊन नाम फाउंडेशनचे काम प्रेरणादायक वाटते. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून डामडौल न करता खारीचा वाटा म्हणून मी मदत केली आहे. (प्रतिनिधी)
मिरवणूक खर्च टाळून केली मदत
By admin | Published: May 16, 2016 1:45 AM