मुंबई : डान्स अॅकॅडमीसाठी अंधेरी येथील कोट्यवधी रुपयांचा भूखंड राज्य सरकारकडून नाममात्र भावात खरेदी केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री व खा. हेमा मालिनी यांनी संबंधित जागा ताब्यात घेण्यास नकार दिला आहे, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारने दिलेल्या माहितीनंतर उच्च न्यायालयाने हेमा मालिनींविरोधात करण्यात आलेली याचिका निकाली काढली. अंधेरी येथे २ हजार चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ७५ हजार रुपयांत हेमा मालिनी यांना डान्स अॅकॅडमी सुरू करण्यासाठी देण्यात आला. हा भूखंड परत घेण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे झाली. त्या वेळी हेमा मालिनी यांनी हा भूखंड स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाला दिली. हेमा मालिनी यांनी भूखंड स्वीकारण्यास नकार दिल्याचे सरकार सांगत असले तरी माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित भूखंड हेमा मालिनी यांना दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारच्या विधानावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती तिरोडकर यांच्यातर्फे अॅड. साधना कुमार यांनी खंडपीठाला केली. भूखंड घेतला नाही, तर या याचिकेमध्ये आता काहीच उरले नाही. मात्र यानंतर भूखंड घेतल्याचे याचिकाकर्त्याच्या लक्षात आले, तर त्यांनी नव्याने याचिका दाखल करावी, असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)
भूखंड स्वीकारण्यास हेमा मालिनींचा नकार
By admin | Published: October 22, 2016 1:31 AM