ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २३ - भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना सरकारने 70 कोटींचा भूखंड 1 लाख 75 हजारात दिल्याचं उघड झालं आहे. हेमा मालिनीच्या नाटय विहार केंद्रास फक्त 1.75 लाखात (87.5 रु वर्ग मीटर दराने) कोटयावधीचा भूखंड बहाल होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयमधून मिळाल्याचं सांगितलं आहे. देशात प्रथमच 1.75 लाखाच्या अल्प दराच्या भूखंडासोबत 8.25 लाखाचा परतावा दिला जाणार आहे अशी माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे.
भाजपा सरकार राज्याच्या जनतेस फसवित असून एकीकडे छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांच्या संस्थेस कोटयावधीचा भूखंड कसा अल्प दरात मिळाला असा आरोप करते आणि दुसरीकडे हेमा मालिनीच्या संस्थेस 70 कोटीचा भूखंड 1.75 लाखात कसे देते, असा सवाल अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांस पाठविलेल्या पत्रात केला असून रेडी रेकनर ऐवजी वर्ष 1976 चे मुल्यांकन दर आकारण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
यापूर्वी हेमा मालिनी यांनी अंधेरी तालुक्यातील मौजे वर्सोवा येथील भूखंड दिनांक 4 एप्रिल 1997 रोजी दिला गेला होता. त्यासाठी हेमा मालिनींच्या संस्थेनं 10 लाखांचा भरणा केला. पण त्यातील काही भाग हा सीआरझेडमुळे बाधित होत असल्यामुळं हेमा मालिनींनी कुठलंही बांधकाम केलं नाही. उलट तिवरांची कत्तल केली होती. भाजपा सरकारनं याबाबीकडे दुर्लक्ष केलं आणि हेमा मालिनीच्या संस्थेस पर्यायी भूखंड वितरित केल्याचा आऱोप गलगली यांनी केला आहे.
हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राने यापूर्वी 10 लाख अदा केले होते. नवीन मूल्यांकन लक्षात घेता 2000 वर्ग मीटर भूखंडाची किंमत 1.75 लाख इतकी होत आहे. पूर्वीच्या 10 लाखातून 1.75 लाख कमी केल्यास उर्वरित 8.25 लाख शासनास परत करावे लागणार आहे. यामुळे भूखंडासोबत शासनाच्या तिजोरीतुन पैसेही परत करण्याची बाब सरकारसाठी शरमेची असून हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच होत असल्याची टीका अनिल गलगली यांनी केली आहे.
हेमा मालिनीवर भाजपा सरकार डबल फिदा #हेमामालिनीhttps://t.co/JJqEKf80T5— ANIL GALGALI (@ANILGALGALIRTI) April 23, 2016