ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. १४ - प्रख्यात छायाचित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील अॅड. हरिश भंबानी या दोघांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हेमा उपाध्याय व हरिश भंबानी या दोघांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात दोन बॉक्समध्ये आढळले होते. या हत्याप्रकरणातील आरोपी मारेकरी उत्तर प्रदेशात लपून बसल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला पाठविण्यात आले होते. त्यांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या अधिका-यांच्या सहाय्याने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले असून एकाचे नाव शिवकुमार उर्फ साधू राजभर असल्याचे समजते.
हेमा व हरिश या दोघांचीही दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध दुहेरी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तीन संशयितांना ताब्यातही घेण्यात आले. डहाणूकर वाडीत शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह नाल्यात सापडला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्याच दरम्यान माटुंगा व सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हेमा व भंबानीच्या मिसिंग तक्रारीमुळे या दोघांच्याही नातेवाईकांना बोलावूनन घेतले. मृतदेहाची ओळख पटताच, कांदिवली पोलिसांनी दुहेरी हत्येसह पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील गुन्हा दाखल केला. पैशांच्या व्यवहारातूनच हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.