मुंबई - सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नववर्षात नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत. त्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा रंगली होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकड़े देण्यात आला आहे. सध्या ते लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत. आज दुपारी 3.30 वाजता ते अतिरिक्त कार्यभार स्विकारणार आहेत.
पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण होते?
1. बिपिन बिहारी - 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, गृहनिर्माण विभागाचे प्रमुख आहेत
2. हेमंत नगराळे - 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या त्यांच्याकडे लीगल आणि टेक्निकल विभागाची जबाबदारी आहे.
3. संजय पांडे - 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते होमगार्ड विभागाचे प्रमुख आहेत
4. रश्मी शुक्ला - 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी, नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार पोलीस महासंचालकपदी एका मराठी चेहर्याला पसंती मिळू शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे मिळूनच अंतिम निर्णय घेणार होते. मात्र, सध्यातरी हेमंत नगराळे यांच्या नावाला शरद पवारांची पसंती मिळली आहे. त्यामुळे त्यांच्याकड़े राज्याच्या सुरक्षेची जबाबदारीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
याबाबत हेमंत नगराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याची माहिती कळाली आहे. याबाबत अधिकृत आदेशाची प्रत सरकारच्या संकेटस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर यूपीएसीकडून आलेल्या नावांपैकी एका नावाची नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या डीजी पदाचा पूर्णपणे कार्यभार दिला जाईल.