Hemant Patil : हिंगोली : शिवसेनेचे (शिंदे गट) हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हेमंत पाटील यांना आता राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची माहिती सोमवारी समोर आली आहे.
हेमंत पाटील हे २०१९ ते २०२४ या काळात हिंगोलीतून खासदार होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतर त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांनी हिंगोलीमधून उमेदवारीसाठी जोरदार तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी तिकीट कापल्यामुळं हेमंत पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कापलेल्या खासदारांना पुन्हा संधी देऊ. त्यांना रिकामं ठेवणार नाही,असा शब्द दिला होता. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या आत एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं आता हिंगोलीसह राज्याच्या राजकारणात हेमंत पाटील यांचं पुन्हा राजकीय वजन वाढणार आहे.