ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - ससून शासकीय रुग्णालयामधून बाळंतिणीसाठीचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या 25 दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्यानंतर या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. तर बाळालाही पळवून नेण्यात आले. या बाळाची विक्री करण्यासाठी हे अपहरण आणि खून करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी बाळाची रविवारी पहाटे सुखरूप सुटका केली. मधू रघुनंदन ठाकूर (25, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी निकिता संतोष कांगणे, चंद्रभागा उडानशिवे, लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव, आकाश उडानशिवे या आरोपींना अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू ठाकूर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मधू यांचे 25 दिवसांचे बाळ आहे. त्याला लस आणि अन्य औषधे देण्याच्या बहाण्याने आरोपी निकिताने मधूचा विश्वास संपादन केला. ससून रुग्णालयातील शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने या चौघांनी त्यांना शुक्रवारी सोबत नेले. मधू दिवसभरात घरी न परतल्याने पती राघूनंदन यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी निकिताला शनिवारी ताब्यात घेतले. बराच वेळ पोलिसांना न बधलेल्या निकिताला चंद्रभागा आणि आकाश यांनी मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. शनिवारी दिवसभर आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. रात्री त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच निकिताने मधूच्या खुनाची कबुली देत तिचा मृतदेह रामटेकडी रेल्वे जक्शन जवळ टाकल्याचे सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर बाळाचा शोध सुरू करण्यात आला. हे बाळ लक्ष्मीच्या ताब्यात असल्याचे समजताच पोलिसांनी काळेपडळ भागात जाऊन लक्ष्मीलाही ताब्यात घेत बाळाची सुखरूप सुटका केली. हे बाळ चंद्रभागा हिला हवे होते. तसेच त्या बाळाची पुढे विक्री करण्यात येणार होती.