ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 14 - दहावीचा निकाल लागला आणि तिने आॅनलाइन गुण पाहिले... ९१ टक्के गुण तिला मिळाले... तिने आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता; पण तिने स्वत:ला घराच्या खोलीत कोंडून घेतले. कारण, तिच्या आई-वडिलांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती; पण तिने ती पूर्ण केली नाही. आता माझे आई-बाबा मला खूप बोलतील. शाब्दिक छळ करतील, पदोपदी अपमान करतील. आता पुढील जगणे मुश्कील होईल, या भीतीने त्या मुलीने स्वत:ला कोंडून घेतले. गारखेडा परिसरातील तपस्या (नाव बदलले आहे.) ही मुलगी अभ्यासात हुशार. तिचे आई-वडील दोघेही इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत कमीत कमी ९५ टक्के गुण मिळावेत, अशी अपेक्षा होती. आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते तपस्यावर सतत दबाव आणत होते. तिने अभ्यासातच लक्ष घालावे, यासाठी तिला सतत बोलत होते. तपस्या मैत्रिणीसोबत थोडा वेळ फिरायला गेली की, मैत्रिणीसमोर तिचा अपमान करीत, नातेवाईकांसमोर पदोपदी अपमानही करीत होते. हा मानसिक छळ व अपेक्षांचा तिच्यावर ताण आला होता. निकालाच्या आदल्या दिवशी तिची आई तिला म्हणाली होती की, काय परीक्षेत बोंब पाडते कोणास ठाऊक... कमी गुण मिळाले, तर आई-वडील काय बोलतील, या भीतीने तिला रात्रभर झोप आलीच नाही... आज सकाळपासून तिने जेवणही केले नाही. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. तिला ९१ टक्के गुण मिळाले. त्याचवेळी वडिलांचा आॅफिसमधून आईच्या मोबाइलवर मेसेज आला ह्यमला माहीतच होते ही समाजात आपले नाक कापणार आणि तसेच झाले.ह्ण आईने हा मेसेज तपस्याला वाचून दाखविला. ९१ टक्के गुण मिळविल्याच्या आनंदाऐवजी घरात मातम सुरू झाला. वडिलांच्या भीतीने तपस्याने स्वत:ला घरातील एका खोलीत कोंडून घेतले. तिच्या आईने मानसोपचारतज्ज्ञांना फोन लावला व म्हणाली की, ९१ टक्के म्हणजे काय मार्क आहेत का, आमच्या मुलीने आमचे नाक कापले, तिच्यासाठी आम्ही वर्षभर अनेक गोष्टींचा त्याग केला. तिच्यासाठी मी नोकरी सोडून माझे करिअर पणाला लावले.तिला आवडते ते वेळेवर खाऊ घातले; पण अखेर आमची भीती खरी ठरली... आता बारावीत काय बोंब पाडते कोणास ठाऊक... आता खोली बंद करून तोंड लपवून बसली, असे म्हणत आईने फोन ठेवून दिला. डॉक्टरांनी तपस्याचा वडिलांना फोन लावला व परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. अति अपेक्षा करू नका, परीक्षेतील गुणांपेक्षा मुलगी महत्त्वाची आहे, असे समजावून सांगितले. वडिलांनी आॅफिस सुटल्यावर दुकानातून पेढे घेऊन सरळ घर गाठले व मुलीला खोलीबाहेर बोलावून तिच्या तोंडात पेढ्याचा घास भरविला. झाले, गेले विसरून जा, आपण हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा करू असे म्हटल्यावर तपस्याचा जीव भांड्यात पडला.गुण महत्त्वाचे की, पाल्य?मानसोपचारतज्ज्ञांनी प्रश्न केला की, पालकांना परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत की, आपला पाल्य, हे आधी निश्चित करावे. ९१ टक्के मार्क घेऊनही तुम्ही मुलीचा मानसिक छळ करीत असाल, तर त्यास काय म्हणावे. अशा वागण्यामुळे पाल्यांचे मानसिक खच्चीकरण होते. हे पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलगा असो वा मुलगी, परीक्षेप्रसंगी सर्वोत्तम पेपर सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. जर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, तर पुढील परीक्षेत अधिक गुण मिळव, असे म्हणून पाल्याचे धैर्य वाढवा. कारण, आयुष्यात केवळ एकच परीक्षा नसते, अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. हे कदापि विसरू नये.
९१ टक्के गुण मिळूनही तिच्यावर आई-वडील नाराज
By admin | Published: June 14, 2017 7:45 PM