मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नुकतीच इंडियन हेरिटेज हॉटेल्स असोसिएशन्सशी हातमिळवणी केली आहे. लवकरच या दोन्ही संस्थांच्या मदतीने राज्यातील गड-किल्ले यांसारख्या हेरिटेज वास्तूंच्या ठिकाणी हॉटेलिंग टुरिझमचा व्यवसाय विकसित करण्यात येणार आहे. राज्यातील हेरिटेज स्थळांना नवी झळाळी मिळावी यासाठी या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.याविषयी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या की, महाराष्ट्राला ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या वैभवशाली संपन्नतेची उपयुक्तता योग्य प्रमाणात व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी, जाधवगड, ढेपेवाडा अशा ठिकाणी हेरिटेज हॉटेलची संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारे ऐतिहासिक स्थळांचे रुपडे पालटून पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. या वेळी, एमटीडीसीच्या वतीने सुरू असलेल्या पर्यटन स्थळांच्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. पुढील वर्षी ‘व्हिझिट महाराष्ट्र २०१७’ ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय, याविषयी लवकरच पर्यटन स्तरांवर जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)
हेरिटेज स्थळांचे रुपडे पालटणार..!
By admin | Published: September 10, 2016 1:48 AM