पेण : पेणसह नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे पेणचे हेटवणे धरण सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ओसंडून वाहत आहे. यामुळे सिडको वसाहतींना सुरळीत पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीचे संकट टळले आहे. सिडकोच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा आता पूर्ण क्षमतेने होणार आहे. रविवारी रात्री पेणसह धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण सोमवारी सकाळी ओव्हरफ्लो झाल्याची माहिती प्रकल्प सूत्रांनी दिली. हेटवणे मध्यम प्रकल्प ही खास पेणच्या शेती व शेतकऱ्यांची जीवनधारा ठरावी असा मास्टर ग्रीन पीस आहे. जूनमध्येच धरणाच्या सुरक्षा प्रतिबंध म्हणून ३४ मीटर पाणी पातळीपर्यंत पाणी ठेवण्यात आले होते. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार ही हवामान शास्त्र विभागाची माहिती व इतर पावसाचे अंदाज वर्तवणाऱ्या वेधशाळांचे अनुमानानुसार हेटवणे प्रकल्प संस्थेने धरणाच्या सुरक्षा प्रबंध काटेकोर केले होते. तब्बल १४७.५० दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची क्षमता असलेले हे धरण सिडकोच्या नागरी वस्त्यांसह पेण परिसरातील चावणे प्रकल्पातील गावे, शहापाडा धरण प्रकल्पातील गावे, वाडी वस्त्यांना पिण्याचे पाणी व शेतीला पाणी देणारे हरितक्रांतीचा स्रोत आहे. मात्र विपुल पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्यांचा विनियोग करण्यास जलसंपदा विभागाला तेवढसं यश मिळालेले नाही. वाशी खारेपाटाला उन्हाळ्याला पाणी टंचाईची झळ लागते. अशा कठीण परिस्थितीत कुबेराचं भांडार असलेला पाणीसाठा हेटवण्यात असून देखील खारेपाटाला तो मृगजळासारखा भासतो. (वार्ताहर)संततधार पाऊसतालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हेटवणे धरण भरून वाहत आहे. यावर्षी बरोबर १ आॅगस्टलाच हेटवणे ओव्हरफ्लो झाले. गतवर्षी १७ आॅगस्टला ओव्हरफ्लो झाले होते. धरण भरल्याने या परिसरातील नागरिक व शेतकरी आनंदित झाला असून पाणीटंचाई दूर होणार आहे.
हेटवणे धरण ओव्हरफ्लो
By admin | Published: August 02, 2016 2:57 AM