नाशिक : वेळ संध्याकाळी पाच वाजेची. ठिकाण नाशिकमधील अशोकस्तंभ. पोलिसांना एक निनावी कॉल येतो... ‘अहो, आमच्या घरी खुप दारू आली आहे वाटण्यासाठी...’ पोलीस मोठ्या चातुर्याने त्या चिमुरड्याकडून घराचा पत्ता जाणून घेत तत्काळ त्या घराच्या उंबऱ्यावर दाखल होतात.ऐन निवडणुकीचा हंगाम रंगात आला असताना नाशिकमधील अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील एका घराच्या छतावर मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या घरावर दारुच्या बाटल्या एका राजकिय पक्षाच्या उमेदवाराकडून लपविण्यात आल्या होत्या त्याच घरातील एका लहानग्याने सरकारवाडा पोलिसांना ‘कॉल’ देऊन आपले कर्तव्य पार पाडले. पोलिसांनी घरावर धडक दिली तेव्हा घराला कुलूप होते; मात्र पोलिसांनी संपुर्ण घरासह आजुबाजुच्या परिसराची पाहणी केली असता छतावर बाटल्या असल्याचा पोलिसांना संशय आला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी मानवी मनोरा घराच्या मागील भिंतीजवळ रचून घराचे छत गाठले. यावेळी छतावर एका इंग्रजी कंपनीच्या १८० मिलीच्या सुमारे पंधरा ते वीस बाटल्या ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व साठा जप्त केला असून संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. एका राजकिय पक्षाच्या उमेदवाराकडून शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना ‘हेल्थ टॉनिक’च्या नावाखाली मद्याचा पुरवठा करण्यासाठी साठा आणल्याची चर्चा आहे. या साठ्यामधून काही साठा या भागासाठी ‘राखीव’म्हणून सदर घराच्या छतावर लपविण्यात आल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू होती; मात्र पोलिसांनी या चर्चेचा इन्कार केला असून त्या दिशेने देखील आमचा तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी दिली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अहो...आमच्या घरी खूप दारू आली वाटण्यासाठी !
By admin | Published: February 16, 2017 7:54 PM