सुनील काकडे : वाशिम
वर्षातील आठ महिने रानोमाळ भटकंती करून उघड्या आकाशाखाली मिळेल, त्या जागेवर चार कोपºयाला खिळे ठोकायचे अन् त्यावर कापडी पाल बांधला की झाले घर तयार...चार घरी भिक्षा मागायची अन् आपली व मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरायची...ऊन, वारा, पावसाची कुठलीच तमा न बाळगता अठराविश्व दारिद्रयात जीवन जगणाºया नाथजोगी समाजाची ही करून कहाणी आजच्या ‘हायटेक’ जमान्यातील सुखासाठी वाट्टेल ते करणाºयांसमोर एकप्रकारचे आव्हान उभे करणारी ठरत आहे.
शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर प्रचंड प्रमाणात माघारलेला घटक म्हणून ओळखल्या जाणारा तद्वतच सुख, सुविधांपासून कोसोदूर असल्याने सुखी संसाराची स्वप्न पाहण्याचाही अधिकार नसलेल्या महाराष्ट्रातील नाथजोगी समाजाची उत्तरोत्तर अधोगतीच होत आहे. आज इथे; तर उद्या तिथे भटकंती करून मिळणाºया भिक्षेवर आपला उदरनिर्वाह करणाºया या समाजातील अनेक कुटूंब आजही उघड्यावर वास्तव्य करित आहेत.
मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील परमेश्वर भोसले, प्रकाश भोसले आणि यशवंत भोसले या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील तीघांचे कुटूंब आपल्या बायका-पोरांसह वाशिम रेल्वेस्थानकानजिकच्या उघड्या जागेवर पाल ठोकून वास्तव्य करित आहे. कधी पावसाने चूल विझते; तर कधी कडक उन्हाने अंग भाजून निघते. मात्र, या जुलमी जमान्यात वावरणाºया कुणालाही याची तमा नाही, असे शल्य परमेश्वर भोसले याने बोलून दाखविले. नाथजोगी समाजाकरिता शासनस्तरावरून कुठल्याही ठोस योजना, विशेष सवलती नसल्यामुळे विकास म्हणजे नेमके काय, हेच या कुटूंबियांना ठावूक नसल्याचेही यावेळी त्यांच्या बोलण्यातून जाणवून आले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने उघड्यावर वास्तव्य करणाºया या कुटूंबातील चिमुकल्यांना विविध आजारांनी पछाडले असून त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. वर्षातील ८ महिने भटकंती करावी लागत असल्याने मुलाबाळांच्या शिक्षणाचा मुख्य प्रश्न ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या शिक्षणाचा देखील गांभीर्याने विचार करून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विशेष प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.