रावेत : भुरट्या चोरांचा सुळसुळाट, भिकाऱ्यांचा सर्रास वावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आकुर्डी रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. त्यामुळे या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे स्टेशन बेभरवशाचे झाले असून, येथील प्रवास सुरक्षित करण्याची प्रवाशांची मागणी आहे. अनेक प्रवाशांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, आकुर्डी रेल्वे स्थानकात पाय ठेवताच प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. येथील चोऱ्या रोखण्यासाठी किमान उपाययोजना उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या स्थानकावरील चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. स्थानकाबाहेर सकाळपासूनच हातगाडी आणि फेरीवाले दिसून येतात. सायंकाळनंतर दोन्ही बाजूंना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाड्या उभ्या असतात. या ठिकाणी मध्यरात्रीनंतर प्रवाशांना लुबाडण्याचे सत्रही सुरू होते. दिवसाही चोऱ्या होतात. याबाबत लोकांच्या तक्रारीनंतर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे अनेक दाखले देता येतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. चोरट्यांवर कारवाई का केली जात नाही, त्यांना कोणाचे अभय आहे, याचा कधी तरी शोध लावणे आवश्यक आहे. त्यांना रोखले पाहिजे अन्यथा प्रवासी कायमच असुरक्षित राहतील, असे प्रवाशांनी सांगितले. पोलीस तक्रार घेत नाहीत. किंबहुना ते उपलब्ध नसतात; मग तक्रार कोठे आणि कशी करायची, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. एकूणच पोलीस आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यावर उपाय शोधले जात नाहीत. चोऱ्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही सराईत वारंवार येथे भटकत असतात. त्यांच्यावर कायमची कारवाई होणे गरजेचे आहे. प्रवाशांनीसुद्धा जागरूक राहून प्रशासनास कळवले पाहिजे. येथे पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी; तसेच प्रवाशांनी तक्रार केल्यास तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. (वार्ताहर)>मागणी : कायम स्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावीआकुर्डी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु वारंवार मागणी करूनसुद्धा पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कधी तरी गस्तीवर पोलीस येतात; पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. कायमस्वरूपी येथे पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी भिक्षेकऱ्यांना स्थानकाबाहेर काढले जाते, असे आकुर्डी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आर. के. तांबे यांनी सांगितले.दिवसा स्थानकाबाहेर सुरक्षितपणे बाहेर पडता येत नाही. याशिवाय वाहनेदेखील पार्किंगमध्ये सुरक्षित राहत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. चोरीच्या घटना रोखल्या पाहिजेत. येथे रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. - मधुकर रेवगे, प्रवासी
चोरट्यांमुळे प्रवासी झाले हैराण
By admin | Published: April 05, 2017 1:29 AM