आनंद कांबळे/ऑनलाइन लोकमतजुन्नर, दि. 26 - जुन्नर तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल बनल्या आहेत. शाळेमधील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्ययन-अध्यापन करता यावे ,मुलांची अध्ययनात रुची वाढावी यासाठी जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी शिक्षकांची जुन्नरमध्ये 23 ते 25 मार्च या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.यामध्ये सुमारे 1200 शिक्षकांना प्राचार्य सबनीस प्रा. विद्यालय आणि प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये सलग तीन दिवस कार्यशाळा आयोजित केली होती. जुन्नर तालुका शैक्षणिक प्रगतीत राज्यात अग्रेसर ठेवण्याबाबत सतत प्रयत्नशील असणारे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांचा मुख्याध्यापक आनंद कांबळे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेत संगणकावर व्हिडीओ कसा तयार करावा, मोबाईलवर व्हिडीओ कसा तयार करावा, पीपीटी कशी तयार करावी, पीपीटीपासून व्हिडीओ कसा तयार करावा, मोबाईलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन करण्यासाठी कोणते व कसे अॅप्स वापरावे, नवीन अॅप्स कसे तयार करावे, मुलांचे अध्ययन रंजक व्हावे यासाठी क्लुप्त्या,शाळेची वेबसाईट कशी तयार करावी याविषयीचे कृतीसह मार्गदर्शन करण्यात आले.सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना मार्गदर्शन करताना गटशिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले की,आपल्या तालुक्यातील 80% शाळा या पूर्ण डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित सर्व शाळा येत्या महिनाभरात डिजिटल होतील. त्यासाठी शासन, पदाधिकारी, समाज, सी. एस. आर, पालक यांची मदत घेऊन काम पूर्ण केले जाईल. शिक्षक संघटना देखील पुढाकार घेत असल्याने आपण सर्व शिक्षकांनी त्या दृष्टीने सक्षम असण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन आहे. गुणवत्तेच्या आणि विविध उपक्रमाच्या जोरावर आपण इतर माध्यमाच्या शाळांपेक्षा वरचढ ठरत असल्याने पुढील वर्षी विद्यार्थी दाखलातीचे प्रमाण आपल्याकडे वाढणार आहे. त्यासाठी सर्वांनी तंत्रज्ञान साक्षर बनने गरजेचे आहे.विद्या परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जुन्नर तालुका राज्यात टॉप 20मध्ये आहे. शिक्षकांनी जे काम केले आहे. त्यामुळे राज्यात जुन्नर तालुकाची मान उंचावली आहे. जुन्नर तालुक्याचे सभापती आणि उपसभापती, मा. गटविकास अधिकारी तसेच पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्याचे नाव गुणवत्तेच्या बाबतीत अग्रभागी ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन के. डी. भुजबळ यांनी केले. मार्गदर्शक तंत्रस्नेही शिक्षक सुदाम साळुंके, नितीन शिंदे, वैभव सदाकाळ यांनी अत्यंत उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
जुन्नरमधले शिक्षक बनले 'हायटेक'
By admin | Published: March 26, 2017 8:49 PM