लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर (जि. सोलापूर) : आळंदीपासून आमच्या सहकाऱ्यांसह सायकल वारी करीत पालखी विसावा व मुक्कांच्या ठिकाणांची पाहणी, बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे़ ४ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच हायटेक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, एकूण सहा हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील़ शिवाय विविध फोर्सही बंदोबस्तासाठी कार्यरत असेल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली़ नांगरे-पाटील म्हणाले की, पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. वाहतुकीस अडथळा करणारे हॉकर्स, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे़ वाहनांची कसून तपासणी करणार आहोत़ लॉज, धर्मशाळा, हॉटेल यांची तपासणी करण्यात येत आहे़ महिलांची छेडछाड रोखण्यासाठी खास पथक तैनात केले आहेत़भाविकांच्या सुरक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ७ अपर पोलीस अधीक्षक, १४ पोलीस उपअधीक्षक, ५९ पोलीस निरीक्षक, २०३ पोलीस उपनिरीक्षक, २७ महिला पोलीस उपनिरीक्षक, ३ हजार २१५ पोलीस कर्मचारी, ५५५ महिला पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे ५० कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेसाठी ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उप-निरीक्षक, ४२० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घातपाताच्या घटना रोखण्यासाठी बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, तसेच पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. महिलांचे विशेष पथक, गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व आवश्यक ठिकाणी प्रखर प्रकाशाची सोय केली जाणार आहे. शहरात तीन झोन तयार करण्यात येणार आहेत़ एसआरपीएफच्या ३ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. १ हजार ४०० पुरुष होमगार्ड तर २०० महिला होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. वारी कालावधीत नेमलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासाची सोय, आरोग्याची काळजीही घेतली जाणार असल्याचेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.
पंढरपुरात आषाढीसाठी हायटेक बंदोबस्त
By admin | Published: June 24, 2017 4:14 AM