पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 04:55 PM2017-12-20T16:55:11+5:302017-12-20T17:02:14+5:30
पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट परिसरात होणा-या सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सनबर्न संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती.
मुंबई : पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट परिसरात होणा-या सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली आहे.
सनबर्न संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच, यामुळे कार्यक्रमामुळे 15 वर्षांवरील मुलांना दारु, सिगारेटचे व्यसन लागल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच, या कार्यक्रमात नियमांचे पालन करण्याची अट उच्च न्यायालयाने घातली आहे. यावेळी अल्पवयीन मुलांना मद्यपान करु देणार नाही. तसेच, कार्यक्रमात 150 सीसीटीव्ही लावण्यात येतील आणि 300 बाऊन्सर्स सुद्धा असतील, अशी ग्वाही राज्य सरकार आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उच्च न्यायालयात दिली.
दरम्यान, उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्याकडून दाखल केलेल्या याचिकेनुसार, गेल्या वर्षी पुण्यात आयोजित आलेल्या कार्यक्रमात 15 वर्षांवरील मुलांना प्रवेश देण्यात आला होता. यंदाही वयाची हीच अट घालण्यात आली आहे. कायद्याने 21 वर्षांखालील मुलांना बारमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमात शाळा-महाविद्यालयांतील लाखो मुले जात असतानाही खुलेआम दारू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येते. गोव्याच्या कार्यक्रमात पोलिसांना ड्रग्सही आढळले होते, अशी कार्यकर्ते रतन लूथ यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षी कंपनीने एमआरपीपेक्षा जास्त किमतीला पाण्याच्या बाटल्या व मद्य विक्री केली होती. या वर्षी हा प्रकार घडू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती याचिकेत केली आहे.
सनबर्न संगीत कार्यक्रम पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे 28 ते 31 डिसेंबरदरम्यान होणार आहे. परसेप्ट लाइव्ह लि.ने आयोजित हा कार्यक्रम आयोजित केला आहे.