ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिल्याने आता दस-याला २२ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकार व शिवसेनेचा अर्ज मान्य करत मेळाव्यास सशर्त परवानगी दिली आहे.
या मेळाव्यात ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करावे लागेल, त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचे निर्देश सरकारला दिले जातील, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर व कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक आणि शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, हे औचित्य साधून शिवसेना यंदाच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
खेळाचे मैदान असलेले शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ‘वीकॉम ट्रस्ट’ने केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिलेला होता. त्यामुळे तेथे खेळाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असून त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी अर्ज केला जातो. गेल्या वर्षी न्यायालयाने शिवसेनेला परवानगी नाकारली होती. यंदा मात्र शिवसेनेऐवजी सरकारनेच न्यायालयात धाव घेत शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची मागणी केली. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सेनेच्या मेळाव्यास परवानगी दिली आहे.