मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राच्या वादावरून उच्च न्यायालयाने सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. राऊत न्यायालयापुढे उपस्थित न राहिल्याने व न्यायालयाच्या समन्सला उत्तर न दिल्याने उच्च न्यालायाने संजय राऊत यांना धारेवर धरले. राऊत न्यायालयात उपस्थित राहिले नाही तर त्यांना आणण्यात येईल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली आहे.बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना २६ आॅगस्ट रोजी समन्स बजावले. त्यांना उलटतपासणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्या. गौतम पटेल यांनी दिला होता. सोमवारच्या सुनावणीत राऊत न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र राऊत मुंबईत नसल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत, १८ आॅक्टोबरनंतर ते मुंबईत येतील, अशी माहिती न्या. पटेल यांना देण्यात आली. त्यावर न्या. पटेल यांनी राऊत यांना २७ आॅक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित हजर राहण्याचा आदेश दिला. ‘यावेळी राऊत उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना आणण्यात येईल,’ अशी तंबी उच्च न्यायालयाने राऊत यांना दिली. सोमवारच्या सुनावणीत सामनाचे फोटोग्राफर राजेश वराडकर यांची उलटतपासणी घेण्यात आली. वराडकर यांनी डिसेंबर २०११ मध्ये एका खासगी कार्यक्रमात बाळासाहेबांचा फोटो घेतला होता. त्यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयाची संजय राऊत यांना तंबी
By admin | Published: October 11, 2016 5:55 AM