शिल्पाच्या मुलांबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:49 AM2021-09-21T06:49:43+5:302021-09-21T06:51:04+5:30
राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी व तिच्या कुटुंबीयांविरोधात अनेक बदनामीकारक लेख व व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर त्यांच्या मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तांबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी चिंता व्यक्त केली.
राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी व तिच्या कुटुंबीयांविरोधात अनेक बदनामीकारक लेख व व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले. प्रसारमाध्यमांना असे बदनामीकारक आणि चुकीचे लेख प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, यासाठी शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, जुलै महिन्यात या याचिकेवरील सुनावणीत न्या. गौतम पटेल यांच्या एकलपीठाने अशाप्रकारे प्रसारमाध्यमांवर सरसकट बंदी घालू शकत नाही, असे म्हटले होते.
या प्रकरणावर सोमवारी झालेल्या सुनावणीत शिल्पा शेट्टीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी अनेक प्रतिवादींशी (मीडिया आऊटलेट, खासगी ब्लॉगर्स आणि व्लॉगर्स) चर्चा केली आणि त्यांनी सर्व मजकूर हटविण्याची तयारी दर्शविली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला होणार असून, न्यायालयाने शेट्टी यांच्या वकिलाला प्रतिवाद्यांचे खासगी ब्लॉगर्स, व्लॉगर्स आणि पारंपरिक माध्यमे, असे विभाजन करण्याचे निर्देश दिले. पारंपरिक माध्यमे दिलेला सल्ला ऐकतील पण आम्ही खासगी ब्लॉगर्स, व्लॉगर्सबाबतही खात्री देऊ शकत नाही, असे न्या. पटेल यांनी म्हटले.
दाव्यावर सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ती इतकी घाई का करीत आहे? प्रसारमाध्यमांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत आदेश देऊ शकत नाही. मग इतकी घाई कशाला? राज कुंद्राचे प्रकरण आणखी काही काळ सुरूच राहील, असे पटेल यांनी म्हटले. ‘मला शिल्पा शेट्टी यांची काळजी नाही. त्या स्वतःची काळजी घेतील. मला त्यांच्या लहान मुलांची चिंता आहे. शिल्पा शेट्टी यांचे मुलांबरोबरील खासगी आयुष्याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत काळजी आहे. या प्रकरणात मुले केंद्रस्थानी आहेत,’असे न्यायालयाने म्हटले.