लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सोमवारी १४ जणांनी शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायमस्वरूपी न्यायाधीश एम.सी. छागला यांचे नातू रियाझ छागला यांचाही या नव्या न्यायाधीशांमध्ये समावेश आहे. राज्याचे महाअधिवक्ता रोहित देव यांचीही अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांच्यासह सुनील कोतवाल, अरुण उपाध्याय, अरुण ढवळे, पृथ्वीराज चव्हाण, मुरलीधर गिरटकर, सोपान गव्हाणे, सारंग कोतवाल, मनिष पितळे आणि उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांचा नव्या अतिरिक्त न्यायाधीशांमध्ये समावेश आहे. तसेच विभा कंकणवाडी आणि भारती डांग्रे या दोन महिलांचाही त्यात समावेश आहे.उच्च न्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांनी १४ जणांना सोमवारी अतिरिक्त न्यायाधीशपदाची शपथ दिली. मुंबई उच्च न्यायालयाला एकूण ९० न्यायाधीशांची आवश्यकता होती. या नव्या न्यायाधीशांमुळे ही संख्या ७५ इतकी झाली आहे. सोमवारपासून या न्यायाधीशांनी कामकाजास सुरुवातही केली.
हायकोर्टाला मिळाले १४ नवे न्यायाधीश
By admin | Published: June 06, 2017 6:19 AM