उच्च न्यायालयाचा डॉ. आनंद तेलतुंबडे यांना तूर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:04 PM2019-02-05T13:04:44+5:302019-02-05T13:24:14+5:30
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
पुणे : डॉ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत विशेष न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले. मात्र, येथील न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. यात उच्च न्यायालयाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण दिले आहे. पुणेपोलिसांनी एल्गार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून डॉ. तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डॉ. तेलतुंबडे यांच्यावर ११ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर डॉ. तेलतुंबडे यांनी त्यांचे वकील अॅड. रोहन नहार आणि अॅड. पार्थ शहा यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना केरळहून परतल्यानंतर अटक केली होती. तसेच शनिवारी तत्काळ विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी व बचाव असा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना दणका देत तेलतुंबडे यांची अटक अवैध ठरवत त्यांना ताबडतोब सोडण्याचे आदेशही दिले होते. दुसरीकडे त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई हायकोर्टात देखील याचिका दाखल केली होती.या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने १२ फेब्रुवारीपर्यंत आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.