कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड याच्यावरील खटला कोल्हापुरात चालवायचा की अन्यत्र याबाबतच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज, गुरुवारी सुनावणी होणार असल्याने बुधवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी खटल्याची सुनावणी २२ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर खटल्याच्या सुनावणीसाठी समीर गायकवाडला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायाधीश बिले यांनी समीरला विचारले, तुझ्या बाजूने वकील पटवर्धन यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. तुला काही सांगायचे आहे काय? त्यावर त्याने मला काही सांगायचे नाही, असे उत्तर दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बेले यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील खटल्याची पूर्तता करता येईल यासाठी २२ जानेवारीस पुढील सुनावणी ठेवल्याचे त्याला सांगितले. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर न्यायाधिश आर. डी. डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरशी संवाद साधला. यावेळी तुझ्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते ३९२ पानांचे असल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही. त्यामुळे हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करत असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधिश डांगे यांनी सत्र न्यायालयाकडे हा खटला वर्ग केला. जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी पोलीस समीरला हजर करण्याची दाट शक्यता होती; परंतु याही सुनावणीस त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांनी समीरला विचारले, तुझ्या बाजूने एस. व्ही. पटवर्धन यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. तुला काही सांगायचे आहे काय? त्यावर त्याने मला काही सांगायचे नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी समीरला तुझ्या विरोधातील खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका तुझ्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्या अर्जाची चौकशी लवकरात लवकर करून घे, त्याचा निर्णय आम्हाला कळू दे, असेही सांगितले. दरम्यान, समीरच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. यावेळी पानसरे कुटुंबीयातर्फे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभय नेवगी तर शासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या हे आपली बाजू मांडणार आहेत. सुनावणीस सहाय्यक सरकारी वकील चंद्रकांत बुधले, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, समीरचे वकील अॅड. एस. व्ही. पटवर्धन, अॅड. एम. एम. सुवासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) समीरच्या जामिनासाठी अर्ज समीर गायकवाडला जामीन मिळावा, यासाठी अॅड. एस. व्ही. पटवर्धन यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यावर २२ तारखेला होणाऱ्या सुनावणीदरम्यान निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली. पानसरे कुटुंबीयांचे प्रतिज्ञापत्र दरम्यान समीर गायकवाड याचा खटला अन्यत्र चालविण्याच्या याचिकेमध्ये आम्हालाही पक्षकार करून घ्यावे, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र पानसरे कुटुंबीयांच्यावतीने मेघा पानसरे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ अभय नेवगी यांच्यामार्फत बुधवारी न्यायालयात दाखल केले. आजच्या सुनावणीसही त्या स्वत: हजर राहणार आहेत. मागणी केल्यास उत्तर देऊ सरकारी वकील बुधले यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, लिगल हेड व क्रिमिनल बार असोसिएशन यांना गायकवाडच्या बाजूने वकीलपत्र दाखल करण्यास कोणी तयार आहात काय, अशी लेखी विचारणा केली. त्यावर त्यांनी समीरने आमच्याकडे कोणत्याही वकिलाची मागणी केलेली नाही. वकिलांची मागणी केल्यास आम्ही त्यावर उत्तर देऊ, असे सांगितले आहे. १५८ साक्षीदार पानसरे हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ने केलेल्या तपासामध्ये १५८ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. उच्च न्यायालयाने हा खटला कोल्हापूर सोडून अन्यत्र वर्ग केल्यास साक्षीदारांना त्याचा त्रास होणार आहे. उच्च न्यायालयाने कोल्हापुरातच हा खटला चालविण्याचे आदेश दिल्यास त्याची पुढील सुनावणी २२ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
खटला अन्यत्र चालविण्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 12:44 AM