नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली़ या सुनावणीत न्या़ आर. के. देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस बजावून आठ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अॅड. सतीश उके यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केलेली आहे़ फडणवीस यांनी २६ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणे दडवून ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मदनलाल पराते वि. हस्तक व इतर आणि मदनलाल पराते वि. देवेंद्र फडणवीस ही ती दोन प्रकरणे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. फडणवीस यांनी अधिकाराचा गैरवापर करून तक्रारकर्ते पराते यांच्या मालमत्तेवर कर आकारण्याचे महापालिकेला निर्देश दिल्याचे याचिकेत म्हटले आहे़ लोक प्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम ३३ (१) नुसार नामनिर्देशनपत्र विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे. परंतु, फडणवीस यांनी काही रकाने रिक्त सोडले. निवडणूक अधिकाऱ्यांनी नामनिर्देशनपत्र तपासताना आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले नाही. पडताळणी पेपरवर निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. या सर्व बाबी लक्षात घेता फडणवीस यांची निवडणूक रद्द करावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस
By admin | Published: December 06, 2014 2:37 AM