मुंबई - पुण्यातील प्रख्यात बिल्डर डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनासाठीची सगळी धडपड आता संपुष्टात आली असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ते दोघे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून विमानतळ प्राधिकरणास हायअॅलर्ट जारी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या.साधना जाधव आज केंद्र सरकारला दिले.घरांसाठी पैसे भरणा-या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेले डी.एस.कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात काही कोटींची रक्कम जमा करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. बुलडाणा अर्बन बँकेला आपल्या कंपनीची एक जमीन विकण्याच्या व्यवहारात आपल्याला १२.५० कोटी रुपये मिळणार असून ते आपण उच्च न्यायालयात जमा करु, असे डी.एस.कुलकर्र्णींच्या वतीने दोनच दिवसांपूर्वी न्यायालयात सांगण्यात आले होते. त्याचा पुरावा म्हणून १२.५० कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टची फोटोकॉपीही दाखविण्यात आली होती. तथापि, ही जमीन सुविधा क्षेत्रासाठी राखीव असून तिच्यावर आधीच बँक आॅफ महाराष्ट्रच्या पुणे येथील एका शाखेतून कर्ज घेण्यात आले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.सिंगापूरच्या प्रभुणे कंपनीचे मालक दिलीप प्रभूणे हे आपल्याला ८० लाख अमेरिकन डॉलरची मदत देणार आहेत ते आपण न्यायालयात जमा करू असेही कुलकर्णी यांनी आधी उच्च न्यायालयास सांगितले होते. प्रभुणे यांनी तसे शपथपत्र न्यायालयात दाखल केले होते. तथापि, तेही शक्य होऊ शकले नाही. प्रभूणे यांनी न्यायालयाची फसवणूक व खोटे शपथपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची नोटीसही न्या.साधना जाधव यांनी आज जारी केली. एक्झेरिया कंपनीचा ५० कोटी रुपयांचा चेकही कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयास दाखविला होता पण तोही जमा केला नाही. ज्या बँक खात्याचा हा चेक होता त्यात केवळ ९६ लाख रुपयेच जमा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. सरकारच्या वतीने अॅड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.
डीएसकेंना कुठल्याही क्षणी अटक, देशाबाहेर जाण्याची ‘पळ’वाट रोखण्याचे हायकोर्टाचे आदेश
By यदू जोशी | Published: February 16, 2018 1:33 PM