मुंबई : मावळ गोळीबारात ठार झालेल्या कांताबाई ठाकर यांचा शवविच्छेदन व केमिकल अॅनलाझर अहवाल चौकशी करताना ग्राह्य का धरला नाही, याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य शासनाला दिले. पवना धरणाच्या पाण्यासाठी ८ आॅगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलानावर पोलिसांनी गोळीबार केला. यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यामुळे या गोळीबारासाठी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका ईश्वर खंडेलवाल यांनी केली आहे. न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात ठाकर या महिलेवर पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनीच गोळी झाडली होती़ ठाकर यांच्या शवविच्छेदन व केमिकल अॅनलाझर अहवालातून स्पष्ट झाले आहे़ मात्र कर्णिक यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याचा दावा खंडेलवाल यांनी केला़ त्यावर वरील आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब केली़ तसेच गेल्या सुनावणीत शासनाने याचे प्रत्युत्तर सादर केले़ यात कर्णिक यांच्याकडून खुलासा मागवल्याचे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत शासन काय खुलासा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)पुणे ग्रामीण विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्याकडून खुलासा मागवला. पोलीस निरीक्षक अशोक पाटील व यशवंत गोवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्याविरोधात कारवाई सुरू केल्याचे शासनाने स्पष्ट केले़
मावळ गोळीबार प्रकरणी हायकोर्टाने फटकारले
By admin | Published: April 17, 2015 1:35 AM