देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:33 PM2021-07-08T12:33:35+5:302021-07-08T12:35:16+5:30

२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

High Court says CBI should extend Deshmukh's probe | देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय

देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय

googlenewsNext

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले  आहे. देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने सीबीआयला दिलेल्या आदेशाचा खरा अर्थ काढला, तर प्रत्येक व्यक्तीची यामधील भूमिका शोधा, असा आहे, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.

२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ५ एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी करून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. मार्चमध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सध्या कारागृहात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

‘आम्ही केवळ वरच्यांच्या आदेशाचे पालन करत होतो, असे म्हणून प्रशासन प्रमुख स्वतः निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही. प्रशासनप्रमुखही त्यास तितकाच जबाबदार आहे. सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घ्या, असे आदेश मंत्र्याने दिले असतीलही परंतु, इतक्या मोठ्या पदावर काम करत असलेली व्यक्ती आपले कर्तव्य पार न पाडता केवळ मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करते?’, असे न्यायालयाने म्हटले.

‘सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा आम्ही करतो. कट रचणारे कोण आहेत, हे आतापर्यंत सीबीआयला समजले असेल, अशी आम्हाला आशा वाटते’, असे न्या. शिंदे यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ जुलैरोजी ठेवली आहे.

‘एकही व्यक्ती सुटणार नाही’
- सचिन वाझे हा धोकादायक माणूस आहे, हे माहीत असतानाही त्याला सेवेत रुजू करणाऱ्या समिती सदस्यांचीही नावे आरोपींच्या यादीत हवीत. आम्ही आता कोणाची नावे घेत नाही. कोणी या पोलिसाला १५ वर्षांनंतर सेवेत रुजू करून घेतले, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर 
- सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी सांगितले की, कट रचणारे कोण आहेत, हे सीबीआयला समजले आहे.
- ‘सीबीआयचा तपास सर्वसमावेशक आहे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही.
- देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीआयकडे देशमुख यांच्याविरोधात पुरावे नाहीत. संपूर्ण एफआयआरमध्ये सीबीआयने देशमुख यांनी पदाचा गैरवापर कसा केला, याबाबत म्हटले आहे. पण पुरावे नाहीत. 
 

Web Title: High Court says CBI should extend Deshmukh's probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.