मुंबई : आपापसांत मारामारी करून पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आलेल्या मीरा- भार्इंदरच्या १९ तरुणांना उच्च न्यायालयाने अजब शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने एका गटाला तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली, तर दुसऱ्या गटाला तीन महिने दर रविवारी महापालिकेच्या दोन शाळा स्वच्छ करण्यास सांगितले. यावर स्टेशन मास्तर व मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.४ जानेवारी रोजी गोराई बीचजवळील फॉन्सेका रिसॉर्टवर मजा करायला गेलेल्या दोन गटांमध्ये ५ जानेवारी रोजी हाणामारी झाली. तक्रारदार अस्लीम अब्रोजच्या एका मित्राला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आशीष धावणे व त्याच्या मित्रांनी मारल्याने अब्रोजच्या मित्रांनी धावणे व त्याच्या मित्रांना मारण्यास सुरुवात केली. या प्रकाराबद्दल अस्लीम अब्रोजने आशीष धावणे व त्याच्या नऊ मित्रांविरुद्ध गोराई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला, तर आशीष धावणेसह दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.ही सर्वच मुले २०- २५ वर्षे वयोगटातील असल्याने त्यांच्या पालकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण चर्चेद्वारे मिटवले. त्यामुळे या सर्वांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.एफआयआर असाच रद्द करण्यात येणार नाही. या सर्वांना काहीतरी समाजसेवा करावी लागेल, असे म्हणत खंडपीठाने अंब्रोज व त्याच्या मित्रांना तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन साफ करण्याची शिक्षा दिली. त्यावर स्टेशन मास्तरांना लक्ष ठेवण्यास सांगितले, तर धावणे व त्यांच्या मित्रांना महापालिकेच्या दोन शाळा तीन महिने दर रविवारी साफ करण्याची शिक्षा ठोठावली. त्यांच्या कामावर शाळेच्या मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयाने ठोठावली १९ तरुणांना स्वच्छतेची शिक्षा
By admin | Published: February 24, 2016 2:01 AM