मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील स्थगिती हायकोर्टाकडून कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:38 IST2025-03-19T13:38:21+5:302025-03-19T13:38:54+5:30
सरकारी कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची मूळ तक्रार माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड यांनी केली होती.

मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील स्थगिती हायकोर्टाकडून कायम
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक व बनावट कागदपत्र प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तथापि, न्यायालयाने कोकाटे बंधू आणि महाराष्ट्र सरकार यांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
सरकारी कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची मूळ तक्रार माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड यांनी केली होती. या प्रकरणात कोकाटे बंधूंना नाशिकच्या दंडाधिकारी न्यायालयाने २० फेब्रुवारीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला सत्र न्यायालयाने ५ मार्च रोजी स्थगिती दिली. या आदेशाला राठोड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. आर. एन. लड्ढा यांच्या एकल खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.